कविता - ही अक्षरे...

लहानमुलांसोबत माती मध्ये खेळतात,

पाटी-पेन्सील घेऊन सायंकाळी बसवतात,

देवनागरी लिपीत मुळाक्षरे लिहीतात,

अन् ही अक्षरे बालपण मज शिकवतात.


एखादा प्रश्न निर्माण करुन देतात,

स्वत:च त्याचे पुरावे कोड्यांमध्ये सांगतात,

रात्रीची गाढ झोप माझी ती उडवतात,

अन् ही अक्षरे स्वप्न पाहण्यास मज शिकवतात.


आनंदाक्षणी गरुडाप्रमाणे उंच भराऱ्या घेतात,

दुःखी असताना पाऊसात रडतात,

थकवा आल्यास निसर्ग सौंदर्य पाहतात,

अन् ही अक्षरे जीवन जगण्यास मज शिकवतात.


काळ्या-निळ्या शाईने कागदांचे गठ्ठे रंगवतात,

रंगलेल्या गठ्ठ्यांमध्ये विश्व निर्माण करतात,

त्या विश्वामघ्ये मला घेऊन हरवतात,

अन् ही अक्षरे आनंदी राहण्यास मज शिकवतात.


कलम घेऊन अनेक कलमे लिहीतात,

हक्क नव्हे तर कर्तव्य पहिल्यांदा बजावतात,

हिंदू, क्रिश्चन वा इस्लामी हा भेदभाव विसरतात,

अन् ही अक्षरे मानवता मज शिकवतात.


पावसाळा येताच अनेक बीज पेरतात,

त्याच बीजापासुन ज्ञानाचे वृक्ष उगवतात,

अज्ञानाचा नाश करून विज्ञानाची सावली पसरवतात,

अन् ही अक्षरे वाट चालण्यास मज शिकवतात.


इतिहासामध्ये घडलेल्या चुका मला सांगतात,

बंदुकीच्या स्पर्धा शाईने मिटवतात,

वर्तमानातुनही भविष्यात प्रवास करतात,

अन् ही अक्षरे वेळेसोबत धावण्यास मज शिकवतात.


प्रत्येक प्रौढ व्यक्तीचा आदर करतात,

गुरूजींना गुरूदेव अशी उपमा देतात,

पंचमहाभुतांना ईश्वराचे रुप सांगतात,

अन् ही अक्षरे संस्कृती मज शिकवतात.


जिथे लेखणी असेल तेथे वास करतात,

पुस्तक-ग्रथांमध्ये नेहमी सापडतात,

सुंदर असो वा नसो बोध ते सांगतात,

अन् ही अक्षरे न शिकवता खुप काही शिकवतात.




कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.

Comments