कविता माझी सांगते...

कविता माझी सांगते...




खऱ्या जीवनाचे बोल कागदांवरती लिहते,

त्याच कागदांमध्ये संपुर्ण विश्व घडवते,

बहरलेल्या साहित्यामध्ये आनंदाला ती पाहते,

त्या साहित्याबद्दल कविता माझी सांगते...


अबोल भावनांशी खेळून कागदावर विश्राम करते,

एकाच ठिकाणी स्थिर राहूनही सर्वांचे विचार बदलते,

माननीय न्यायाधीशांजवळ न्याय लिहीते,

त्या लेखणीबद्दल कविता माझी सांगते...


मुखवट्यांमागे मुखवटे बदलण्यास भाग पाडते,

कोणाला रडवते तर कोणाला आयुष्य शिकवते,

पात्रांमागे राहुनही कला व्यासपीठ गाजवते,

त्या व्यासपीठाबद्दल कविता माझी सांगते...


बैलांसोबत खांद्यावर नांगर घेऊन ज्ञानांचे बीज पेरते,

शेतकऱ्यासोबत राहुन सर्वांच्या पोटची खळगी भरवते,

बहिणाबाईंच्या ओव्या काळ्या मातीत गाते,

त्या शेतकऱ्याबद्दल कविता माझी सांगते...


तिच्या प्रत्येक कार्यात स्वत:ची प्रतिमा साकारते,

परिवाराच्या समाधानातच आनंद ती मानते,

साक्षात भगवंताचे रुप त्या मातोश्रीस पाहते,

त्या आईबद्दल कविता माझी सांगते...


हल्ला होताच सीमेवरती रक्तांच्या नद्यांसोबत वाहते,

बदलेची आशा मनात धरत शत्रुचीही झोप मोडते,

कधी-कधी तिरंग्यामध्ये त्यांच्यासोबत येते,

त्या वीर जवानांबद्दल कविता माझी सांगते..


दिवाळीला लाल मातीत किल्ले तयार करते,

पाटीवरती बाराखड्या घोकुन घोकुन लिहीते,

सायंकाळी आजीच्या कुशीत गोष्ट ऐकुन झोपते,

त्या बालपणाबद्दल कविता माझी सांगते...


आकाशात उंच-उंच घिरक्या निर्भीडपणे घेते,

दिवस मावळताच झाडांवरती किलबिलाट करते,

पावसाळ्यात निर्सगातील रंगांमघ्ये रंग भरते,

त्या पक्ष्यांबद्दल कविता माझी सांगते...


लहानवयातच कोण अनोखे व्यासपीठ गाजवते,

तर कोण संगीतांमधुन जगावर राज्य करते,

साहित्यप्रेमींना मात्र सर्वप्रथम आमंत्रणे पाठवते,

त्या कलाकारांबद्दस कविता माझी सांगते...


निर्सगाचे आतोनात घडणारे प्रेम ती स्वतअनुभवते,

लेखणीला ह्रदयाजवळ ठेवून कवींच्या श्वासात श्वास घेते,

शब्दांशी नाते जोडूनभावनांचे यमक ओळींमध्ये जोडते,

त्या कवितेबद्दलच कविता माझी सांगते...







कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.

Comments

Post a Comment