स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्यानंतर

 

स्वातंत्र्यवीर हा शब्द ऐकल्यावर फक्त एकच व्यक्ती समोर येते, ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. भारतात असे अनेक लोक सापडतील ज्यांच्या नावासमोर हिंदूहृदयसम्राट हा शब्द लागतो, परंतु भारतात ज्यांच्या नावासमोर स्वातंत्र्यवीर हा शब्द पूर्ण अभिमानाने आणि आदराने लावला जातो असे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणून सावरकर यांना उल्लेखले जाते. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती हा कदाचित माझा तिसरा लेख असावा. पण अजूनही मला एका गोष्टीची उणीव भासते ती म्हणजे स्वातंत्र्यवीरांच्या कार्याची किंवा त्यांनी घडवलेल्या इतिहासाची स्वातंत्र्यकाळानंतरही न झालेली अंमलबजावणी. फक्त स्वातंत्र्यवीरच नाहीत तर असे अनेक स्वातंत्रसेनानी आहेत ज्याच्या कार्यावर आम्ही स्वातंत्र्यानंतर पडदा टाकून किंवा त्यांचा इतिहास हा फक्त जयंती-पुण्यतिथीला बाहेर काढून इतरदिवशी ग्रंथालयातील पुस्तकांमध्ये ठेऊन मोकळे झालेलो आहोत.

काही महिन्यांपूर्वी अनेक वाद पेटले होते, त्यापैकी एक म्हणजेच एका ज्ञानी आणि युवा राजकारण्याने ( राहुल गांधी ) आपल्या स्वातंत्र्यवीरांवर आरोप केला की “मी सावरकर नाहीये, मी माफी मागणार नाही” असे बोलून स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची पातळी तर निच्चांक स्तरावर ठेवलीच होती त्यासोबतच ह्या देशाच्या एका महान क्रांतिकारकावर संशयाचे बोट सुद्धा उपस्थित केले होते. गोष्ट अशी की “स्वातंत्र्यवीरांनी माफी मागितली होती का ?” ह्याचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. स्वातंत्र्यवीरांचे एकही पुस्तक न वाचता, त्यांचे आत्मचरीत्र न वाचता फक्त पत्र व्यवहार वाचून एखादे मत ठोकणे कितपट योग्य आहे हे वाचकांनी लक्षात घेतलेच पाहिजे. सावरकरांनी इंग्रजांना अनेक पत्र लिहिले असतीलही, त्यामधील दिनांक १४ नोव्हेंबेर १९१४ ची दया याचिका जर आपण व्यवस्थित वाचली असता; अनेक मुद्दे लक्षात येतीलही. सावरकरांनी दया याचिका लिहिली होती, माफीनामा नाही लिहिला. जर आम्हाला दया याचिका आणि माफीनामा ह्या दोन शब्दांमधील फरक समजत नसेल तर आम्ही खऱ्या अर्थाने साक्षर नव्हेच. पुढील गोष्ट अशी की, एखाद्या अज्ञानी राजकारण्याने एखादा मुद्दा एकाद्या महान क्रांतिकारकाबद्दल बोलत असेल तर आम्ही कितपट त्या व्यक्तीचे ऐकायचे हे आपण ठरवायचे असते. आणि आम्ही काय करतोय, मागे पुढे न पाहता त्या महान क्रांतिकारकाच्या कार्यावर संशय घेतो. मध्यंतरी सावरकरांचे आत्मचरित्र ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक १६ महिन्यात दोनवेळा वाचावे लागले. पहिल्यांदा वाचले ते सावरकरांचे कार्य जाणून घेण्यासाठी आणि दुसऱ्यांदा वाचले अशा अज्ञानी व्यक्तींच्या मनात सावरकरांबद्दल प्रेम वाढवण्यासाठी आणि द्वेष कमी करण्यासाठी. जेव्हाही सावरकरांनी दया याचिका इंग्रजांकडे सादर केली तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. अंदमानच्या कारागृहात जेव्हा सावरकर जन्मठेपेची शिक्षा भोगत होते तेव्हा त्यांना किंवा जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्यांना ‘राजकैदी’ असे उल्लेखले जात होते. ह्याच पूर्ण उल्लेख हा ‘माझी जन्मठेप’ ह्या पुस्तकामध्ये वाचायला भेटेलच. ह्या राजकैद्यांना ठराविक कालानंतर अंदमान बेटांवर रहाण्यास सोडले जात होते, तसेच आपल्या परिवारास भेटण्याच्या अनेक संधी असायच्या त्यासोबतच आपल्या परिवारास पत्र पाठवण्याची तरतूद त्यामध्ये होती. ह्याचा लाभ इतर राजकैदी घेत होते, परंतु सावरकर यांना यापासून दूर ठेवले जाई. जेव्हाही सावरकर त्यांच्या तरतुदीबद्दल चौकशी करत असत तेव्हा त्या तरतुदिस अजून वेळ आहे असे सांगितले जाई. ह्याच गोष्टीला त्रासून सावरकरांनी दया याचिका इंग्रजांना लिहिली. माझ्या वायक्तिक वाचनात आलेल्या जवळपास सात दया याचिका ही इंग्रजांच्या कार्यास कंटाळून आणि बाकी राजकैद्यासारखेच आपल्यालाही अधिकार मिळावेत म्हणून त्यांनी दयायाचिका लिहिल्या आहेत. वरती उल्लेख केल्याप्रमानेच दुसऱ्या दया याचिके मध्ये सावरकरांनी पत्राच्या ( याचिकेच्या ) शेवटी असे लिहिले आहे – “फक्त एक समर्थ्यशालीच दयवान असु शकतो आणि म्हणून जो ताकदवान आहे, तोच दयाळूपणे वागू शकतो. शिवाय एक पश्चात्तापदग्ध, प्रामाणिक मुलगा पित्यासारख्या सरकारच्या दरवाजाखेरीज अन्यत्र कुठे जाऊ शकेल ? महाराज, माझ्या याचनांचा दयाळूपणान विचार करावा.” एखाद्या पत्राचा शेवट हा खूप काही सांगून जातो, अगदी त्याच पद्धतीने सावरकरांच्या दुसऱ्या दयायचिकेचा शेवटही खूप काही बोलतो. ह्या सर्वांवरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, सावरकरांनी माफीनामा लिहिलाच नाहीये, त्यांनी लिहिली ते होती एक दयायाचिका. स्वातंत्र्यवीर एक बॅरिस्टर होते; माफी कोठे मागावी, दया कोठे मागावी, कोणाला पत्र पाठवावे, पत्रामध्ये काय लिहावे ह्याचा अभ्यास त्यांना अगदी बारकाईने असणारच. आपल्या जीवनात सर्व नियम काटेकोरपणे पाळणारे, मग ते सरकारी असोत वा धार्मिक; आणि स्वत:चे सर्व हक्क बजाऊन इंग्रजांकडे आपल्या अधिकारांची मागणी करणारे सावरकर कोठे आणि साधा भाजीपाला घ्यायला जाताना वाहतूकीचे नियम मोडणारे आम्ही बेजबाबदार नागरिक कोठे ? मग आम्ही कोण आहोत त्यांना बोट दाखवणारे ? स्वत:चे हक्क आणि कर्तव्य न बजावता अधिकार मागणारे आम्ही कर्तव्यदक्ष नागरिक ? व्वा !

मध्यंतरी एक माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार हिने सावरकरांबद्दल एक टिप्पणी केली. ती व्यक्ती म्हणाली “बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. हे शस्त्र राजकीय विरोधात वापरायला हवे, असे सावरकरांचे विचार होते. या विचारांशी प्रामाणिक असलेल्या माझ्यासारख्या आणि येथे असलेल्या महिलांनी सुरक्षित कसे समजावे ?” मी ह्या ताईंना विचारू इच्छितो की त्यांनी हा सावरकरांचा विचार स्वत: वाचला की त्यांच्या कानावर कोणी घातला ? जर त्यांनी स्वत: वाचले असतं तर त्यांना खरा अर्थ समजला असता, ते म्हणतात ना ‘अर्धवट ज्ञान धोक्याचे असते’ अशी गोष्ट इथे घडलेली आहे. हयाबद्दल संदर्भासाह स्पष्टीकरण मी देतो. सावरकरांनी त्यांचे आत्मचरित्र ‘माझी जन्मठेप’ ह्यापुस्तकामध्ये काही भागांमध्ये ‘बलात्कार’ ह्या शब्दाचा उल्लेख केला आहे. बलात्कार हा शब्द सावरकरांनी अनेकांना होणारा आणि सहन न करता येणाऱ्या वेदनादायक त्रासाला उल्लेखून केला आहे, त्यासोबतच धर्मप्रचार आणि धर्मांतर ह्या मुद्याला अनुसरूनही केला आहे. जर ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक वाचले तर त्यातून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, बलात्कार ह्या शब्दाचा शाब्दिक अर्थ न घेता त्यामागे जाणवणारा महाभयंकर अत्याचार ह्याला अनुसरून तो शब्द वापरला आहे. आत्ता ह्या शिवानी ताई म्हणत असतील की, सावरकरांचा हा विचार पाहून महिलांनी स्वत:ला कसे सुरक्षित समजावे ? तर त्यांना उत्तर असे की, बलात्कार ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ न घेता त्यामागील संपूर्ण संदर्भ आणि स्पष्टीकरण वाचावे त्याशिवाय तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये. इथून तिथून मलाही तो अधिकार नाहीये, जर मला त्या गोष्टीचे पूर्व माहिती किंवा मागील इतिहास नसेल माहिती. ह्या अशा गोष्टीमुळे अनेक क्रांतिकारक, अनेक स्वातंत्र्यसेनानी ह्यांच्या कार्यवर बोट दाखवले जाते. खैर आमचे क्रांतिकारक यांचे व्यक्तिमत्त्व किंचितही वाईट नाहीये की त्याच्या कार्यावर बोट दाखवले जाईल. परंतु असे अनेक बिनडोक राजकारणी स्वत:च्या खुर्चीसाठी चुकीची माहिती पसरवतात आणि समोर बसलेली असाक्षर जनता ते जे बोलतात ते एकते आणि त्यांनाच निवडून देऊन शांत बसते. अशा राजकारण्यांना त्याची लायकी दाखवलीच पाहिजे, लायकीच काय तर त्यांना ह्या देशात राहण्याचा अधिकार सुद्धा नाहीये.

सावरकरांच्या कार्याबद्दल जितकी महती सांगावी तितकी ती कमीच आहे. सावरकरांनी तब्बल ७० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत, परंतु स्वातंत्र्यानंतर फक्त ४१ पुस्तकेच प्रकाशित होतात. मग बाकीचे पुस्तके कोठे गेली ? ह्याचा प्रश्न तुमच्या-आमच्या सारख्या वाचकांना पडायलाच हवा. आहो, ज्या व्यक्तीने ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक लिहून भारताच्या इतिहासाला वेगळेच वळण दिले; ज्या लेखकाने ‘हिंदुत्व’ नावाचे पुस्तक लिहून खऱ्या हिंदूचे हिंदुत्ववादी विचार काय असतात हे जगासमोर आणले; ज्या लेखकाने ‘भारताच्या इतिहासातील सहा सोनेरी पाने’ हे पुस्तक लिहून आपला संपूर्ण इतिहास एका वेगळ्या वळणावर नेहून ठेवला अशा महान क्रांतिकारी लेखकाचे पुस्तके आम्ही विसरतो, धड शोधण्याचा प्रयत्नही आमचे हे सरकार करत नाही. आहो आपल्या स्वातंत्र्यवीरांनी महाराष्ट्राला नव्हे तर जगाला काय नाही दिले ? ‘सावरकर समग्र’ नावाचे महाकाव्य संग्रह हा सावरकरांचाच. जगात नाव गाजवणाऱ्या कविता ‘अनादि मी, अनंत मी’, ‘सागरा प्राण तळमळला’, ‘जयोस्तुते’ ह्यासारखे अनेक रचना सावरकरांच्याच. मराठी, हिंदी, बंगाली, तमिळ आणि इंग्रजी ह्या भाषांमध्ये तब्बल २३००० पाने लिहिणारे हे महान लेखक. मराठी भाषेची पायाभरणी करणारे महान लेखक म्हाइंभट यांनी ‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ लिहिला, परंतु आधुनिक मराठीची पायाभरणी करून तिला जपणारे, वाढवणारे आमचे हे स्वातंत्र्यवीर सावरकरच. ह्याचे एक उदाहरण द्यायचे झालेच तर, दिन + अंक बरोबर दिनांक हा शब्द तयार होतो. हा शब्द सवरकरांचाच, त्यांनीच दिनांक हा शब्द पहिल्यांदा वापरला, त्याआधी तारीख हा शब्द वापरला जात होता. असे अनेक शब्द आहेत जे सावरकरांनी तयार करून ह्या मराठी भाषेला दिले. इतकेच नव्हे तर हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा व्हावी ह्याची पहिली चळवळ अंदमान येथून झाली, आणि ती चळवळ उभारण्याचे काम सावरकरांनीच केले. विविध भाषेतील साहित्य हिंदीमध्ये अनुवादित करणे, अंदमान येथे असलेल्या कैद्यांना हिंदीचे महत्त्व समजाऊन देऊन त्यांना हिंदी शिकवणे आणि हिंदी शिकवण्यास भाग पाडणे, इंग्रजांच्या दप्तरातील सर्व कागदोपत्रीत कामे इंग्रजी, उर्दूमधून बरखास्त करून हिंदीमध्ये प्रचलित करण्याचे महान कार्य हे एकट्या सावरकरांचेच. ह्याचे पुरावे हे ‘माझी जन्मठेप’ ह्यापुस्तकाखेरीज जे कैदी सावरकरांसोबत होते त्यांच्या आत्मचरित्रातही पाहायला भेटेलच. असे हे महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.

“हे मातृभूमी तुझंसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण” असे आपल्या हिंदुस्तानाला उद्देशून बोलून, हसत हसत जन्मठेपेची शिक्षा राष्ट्रसेवा म्हणून भोगणारे सावरकर कोठे आणि आम्ही त्याच्या पायातील नखाची बरोबरी सुद्धा करू न शकणारे नागरिक कोठे ? “देहापासून देवाकडे जाताना देश लागतो आणि ह्या देशाचे आम्ही देणे लागतो” अशी हिंदुस्तानची महती गाणारे सावरकर, जन्मठेप झाल्यानंतरही देशकार्यात म्हणजेच स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी होऊन राष्ट्रकार्य करतात. ह्या देशातील सर्व तरुण ह्यांना उद्देशून सावरकर म्हणतात, “प्रेयसीच्या केसांतून फिरणारी तुमची बोटे जर बंदुकीच्या चापावरुन फिरू लागली, तर आणि तरच हिंदुस्तान जगू शकेल”; आणि अशा अनेक लेख, पत्र, निबंध, कविता व पुस्तकांमधून नेहमीच ह्या पिढीला तसेच भविष्यात येणाऱ्या पिढीला राष्ट्रकार्याबद्दल प्रोत्साहित सतत करतील. स्वातंत्र्यवीरांबद्दल काय लिहावे आणि काय नाही याचा सवाल मलाच पडलेलाच आहे. महान विचारांच्या ज्वलंत सूर्याबद्दल महती गाणारा मी एक दिवा, त्याच्याबद्दल काय म्हणून लिहिणार ? ज्याचे साहित्य वाचून, ज्यांच्या विचारांवरती मी वाढलो, त्या स्वातंत्र्यवीरांचे मी फक्त विचार जोपासून पुढे वाढवू शकतो.

स्वातंत्र्यवीरांच्या ह्याच जयंतीबद्दल आम्ही सावरकरांना काय देऊ शकतो? फक्त ‘एक भारतरत्न’. सावरकरांच्या कार्यालासुद्धा भारतरत्न कमी असेलच, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व, असे आमचे स्वातंत्र्यवीर ! हिंदूह्रदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांना शतः शतः नमन !


लेखक : शिवम सत्यवान मद्रेवार.

रा. छ. शा. म. कृषी महाविद्यालय, कोल्हापूर.

#मी_पण_सावरकर 


(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.

Comments

  1. लेख आवडला, अप्रतीम लेखन.

    ReplyDelete
  2. लेख आवडला, अप्रतीम लेखन ,.
    पुराव्यानिशी स्पष्टीकरण केले आहे म्हणून मुद्दा लवकर समजतो आहे.

    ReplyDelete
  3. अप्रतीम लेख

    ReplyDelete
  4. लेख आवडला.. . छान लेख👌

    ReplyDelete
  5. खूप भारी माहिती दिली आहेत आपण 🙏🙏लोक कोणतीही पार्श्वभूमी न जाणता बोलतात त्या लोकांना हा लेख वाचायला द्यायला हवा मग ते शहाणे होतील

    ReplyDelete
  6. सत्य परिस्थिती मांडली, सद्य स्थितीत खरोखर सावकारांचे विचार समाजात रुजायला हवेत, नवं परिवर्तन व्हावे...

    ReplyDelete

Post a Comment