कोरोना हरला ?

अगदीच बरोबर वाचले तुम्ही, “कोरोना हरला ?” कोरोनाला येऊन जवळपास आजच्या घडीला दिड वर्षाहून अधीक कालावधी झाला. कोरोनाने खुप काही चांगल्या गोष्टी घडवल्या तसेच खुप काही वाईट गोष्टींना प्रोत्साहन सुध्दा दिले. वाईट गोष्टींची यादी इतकी आहे की काही विचारण्याचे नको तेवढीच चांगल्या गोष्टींची यादी सुध्दा आहे परंतु त्याचे महत्त्व इतके कमी आहे की ती वाईट गोष्टींच्या यादीच्या खाली दाबली गेली. कोरोना या महामारीने सर्व क्षेत्रात प्रवेश केला, अनेक गोष्टींची आठवणही करुन दिली व लोकांच्या जीवनशैलीत आमुलाग्र असे बदलही त्याने घडवले. थोडक्यात पाहण्यास गेले तर मास्क लावण्याची सवय आज त्याने आम्हास लावली आहे, काहींना लवकर उठण्याची तर काहींना उशिरा उठण्याची सवय या कोरोनाने लावली. तसा या कोरोनाचा न-कळत असा फायदा आपल्याच विशिष्ट अशा भागास झाला; लॅाकडाऊनच्या काळामध्ये कित्येकांनी पुस्तकांचे वाचन सुरु केले, कित्येकांनी रंग भरण्यास सुरुवात केली, कित्येकांनी साहित्याच्या विश्वात जन्म घेऊन कविता, लेख लिहिण्यास सुरुवात केली; असे अनेक कलाकारांचा उदय ह्या लॅाकडाऊन मध्ये झाला आणि तसे पाहिले तर ह्या लोकांना बदलण्याच्या स्पर्धेत कोरोना जिंकला. तर मग कोरोना हरला तरी कोठे ?


शिक्षण, शिक्षण एक असे क्षेत्र आहे जेथे तुम्ही एकदा गेलात तर पहिल्यांदा विद्यार्थी आणि मग ज्ञान ग्रहण करुन त्याच ज्ञानाचा सदुपयोगाने त्या विद्यार्थ्याचे रुपांतर ज्ञानार्थी मध्ये होते. कोरोना ह्या महामारीच्या येण्याच्या पुर्वी कोणीही कधीही विचारही केला नसेल शिक्षण हे क्षेत्र पुर्णत: ॲानलाईन येईल ! अहो हे एक असे क्षेत्र आहे जेथे आम्हाला हातात पेन-पेन्सील-खडू कशी धरायची ते शिकवून हातात हात धरुन अक्षरे गिरवण्यास शिकवले गेले. जिथे वर्षामधील मित्र-मैत्रीणींसोबत मौज मजा चालत होती, त्या बाकावरती बसुन काळ्या फळ्याकडे पाहायचे, त्याच्या सोबत प्रश्नोत्तराची नाते जोडायचे अशा अनेक अविस्मरणीय आठवणींचा साठा त्या वर्गात आम्ही कमवला. मधील सुट्टी झाली कि एकत्र बसुन जेवायचे, वर्गात मस्ती करायची, बाजुला बसलेल्या मित्राला किंवा मैत्रीणीसा उगाचच डवचायचे, व्हरांडात मुक्तपणे संचार करायचे आणि महत्त्वाचे म्हणजे “घंटा कधी वाजते ?” याची वाट पाहत बसायचे, अन् घंटा वाजली रे वाजली तेव्हा आमचेच काही मित्रमंडळी घराकडे असे पळत सुटायचे कि एक दिवस त्या उसेन बोल्टला मागे टाकून ॲालंपिक मधील पाच-सहा मेडल तर सहज आणतील. काय करावे त्यावेळची गोष्टच वेगळी होती. एवढेच शब्द सोबत आहेत; गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी.

( लेख थोडासा मोठा वाटेल पण पुढे खुप मनोरंजक असे सत्य मांडले आहे, नक्की वाचा )


आजची परिस्थिती वेगळी आहे, काल प्रत्यक्षात शिकवले जाणारे वर्ग त्या मोबाईल वरती आलेत. गुगल क्लासरूमच्या माध्यमातुन क्लासेस घेतले जातात, तिथे समोर ऐकत बसावे लागते. ज्या गोष्टी प्रत्यक्षात शाळेत करता येत होत्या त्या आता ॲानलाईन क्लासेस मध्ये मुळीच करता येत नाहीत. बाजुच्या मित्राला वा मैत्रीणीला डिवचायचे म्हटले तर आम्हाला आमच्या बाजुचा मित्रच माहिती नाही. एकत्र बसुन जेवायचे म्हटले तर घरातल्या व्यक्तींसोबतही एकत्र बसुन जेवता येत नाही. फळ्यासोबत जे काही नाते जोडले होते ते गुगल सोबत झाले आहे, काल आम्ही फळ्याला प्रश्न विचारत होतो तो आम्हाला समजेल असे आमच्या स्तरावरती येऊन उत्तरे सांगुन त्याची उदाहरणे देत होता पण गुगल नाही देत; आणि जरी गुगलने उत्तरे दिलीत तर कधी अर्धवट असतात तर कधी खुपच खोलामध्ये. शाळेमध्ये असताना आम्हाला प्रकल्प दिला जात होता, तो आम्ही कागदावर पेनाने सोडवून जमा करत होतो परंतु आजच्या मुलांना मोबाईल दिला जातो व वर्ड फाईल मध्ये टाईप करुन प्रकल्प पाठवा म्हणुन सांगितले जाते. हो त्याच्या एक फायदा झाला कि मुलांना तंत्रज्ञान शिकण्यास मिळाले, परंतु महोदय जरा विचार करा ना “तुमच्या भावाने-बहिणीने/मुलाने-मुलीने शेवटचा पेन हातात धरुन कधी प्रकल्प लिहीला होता ?” आज त्यांची हस्ताक्षर पहा कसे झालेत, बदल समजेल. हो, ठिक आहे मान्य केले; ९ वी, १० वी, ११ वी, १२ वी च्या मुलांसाठी तुम्ही ॲानलाईन शिक्षण चालु केले, परंतु त्या ४ थी, ५ वी च्या मुलांचा विचार करा ना ! आम्ही ५वी, ६ वी मध्ये असताना अभ्यास पुर्ण झाला नाही तर वही घरी राहिली म्हणुन सांगत होतो, हे कारण प्रत्येकाने दिले आहे त्यामध्ये मला थोडासाही संकोच नाही. पण मला प्रश्न असा पडला आहे, आता ते ५ वी, ६ वी चे मुले घरीच असतात आणि वही राहिली म्हणुन कारणच सांगतां येत नाही. शाळेत जायचे नसेल तर आम्ही पोट दुखते, पाय दुखते म्हणुन कारण सांगत होतो; आत्ता पोट दुखले काय आणि पाय दुखले काय खुर्चीवर बसुन मोबाईल वरती तास करायचे म्हणचे करायचे, सुट्टीच मिळत नाही. जी मजा त्या शाळेत बसुन शाळा सुटण्याच्या घंटेची वाट पहायचे ती सुध्दा पाहता येत नाही त्यामुळे आमच्या शाळकरी मुलांना घरी जाताना वेगानेही जाता येत नाही. शाळेत असताना वर्गासोबत त्या मैदानाचीही मैत्री होते, परंतु आज त्याच विद्यार्थ्यांना विचारा “मैदानावर कधी गेला होता ?” उत्तर नक्कीच आश्चर्यकारक असेल !


काल एक बातमी पाहिली, नागपूरच्या इशिता नावाच्या चिमुकलीची होती; अक्षरक्ष: हि बातमी ऐकल्यावर अश्रु आवरले नाहीत. त्या चिमुकली कडे ॲानलाईन क्लासेस करण्यासाठी मोबाईलच्या रिचार्जला लागणारे पैसे नव्हते; तिला सांभाळणारे तिचे पालक सामान्य मजुर होते, काम नसल्यामुळे मजुरी मिळाली नाही अन् मजुरी नाही म्हणुन पुढे असे…मध्यस्थी कोल्हापूरच्या चिमुकल्याचा सुध्दा व्हिडिओ पाहिला, त्याचीही परिस्थीती काही रित्या अशीच. महामारी मुळे शिक्षण ॲानलाईन झाले अन् अर्खव्यवस्था बिघडवली; धड शास्त्रही मिळाले नाही अन् अर्थ ही कमवले नाही.


कोरोनाच्या महामारीमुळे प्रदुषन कमी झाले व निर्सगाच्या परिस्थिती मध्ये थोडी फार सुधारणा झाली, त्याच्यामुळेच अनेकांची जीवनशैली बदलली, तसेच अनेक सामान्य मानसातुन कलाकार बनले तेथे सर्व क्षेत्रात कोरोनाने बाजी मारली व एक हाती खेळ जिंकला. परंतु नागपूरच्या इशिता सारखे अनेक मुले आहेत, त्याचीही परिस्थिती अशीच असणार. नागपूरच्या इशिताची गोष्ट असेल किंवा कोल्हापूरच्या चिमुकल्याची गोष्ट असेच तसेच त्याच्यांसारखे असंख्य असे अमाप बालक त्यांची परिस्थिती लक्षात घेता आणि शिक्षण क्षेत्रातील अशा बदललेल्या घटना पाहताना एक गोष्ट लक्षात येते, कोरोनाने बाकिच्या क्षेत्रात बाजी मारली असेल पण इथे मात्र तो हरला.


हो, असे म्हटले जाते की विधात्याकडे सर्व हिशोब लिहिलेली असतात, अरे विधात्या तुला त्या चिमुकल्यांबद्दल एक कळकळीची विनंती आहे रे 

हातात त्यांच्या दुरध्वनी नको लेखणी धरु देत, 

ॲानलाईन नको, प्रत्यक्षात फळ्याकडे पाहु देत,

अडचणींवर मात करुन स्वप्नांची वाट चालू देत,

अरे, यशाचे गीत चिमुकल्यांना अभिमानाने गाऊ देत”


कोरोनाला मानवास दाखवाचे होते की मानवाच्या चुकांमुळे हे घडले, परंतु चुक दाखविण्यासाठी तु क्षेत्र चुकिचे निवडले, 

आणि आज मला हे लिहिण्यात काहीच संकोच वाटत नाही;

कारण, कोरोना हरला…




लेखक - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.


Comments

Post a Comment